top of page

स्टोरी टेलिंग

गोष्टींची परंपरा... पिढ्यांना जोडणारा संस्कार

भारतीय संस्कृतीत गोष्ट ही केवळ मनोरंजन नव्हती; ती ज्ञान, अनुभव, मूल्ये आणि संस्कार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणारे प्रभावी माध्यम होती. बदलत्या काळात हीच समृद्ध परंपरा नव्या स्वरूपात मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न म्हणजे ‘भीष्म कथा संस्कार’.

एक काळ होता...

जेव्हा गोष्टी सांगण्यासाठी वेगळा वेळ ठरवावा लागत नव्हता.

पूर्वीच्या एकत्र कुटुंबपद्धतीत मुलांचे जग माणसांनी आणि गोष्टींनी समृद्ध होते. आजी-आजोबा, काका-काकू, मामा-मामी, नातेवाईक आणि शेजारी मुलांसोबत गप्पा मारत, खेळत आणि गोष्टी सांगत. मुलांच्या असंख्य प्रश्नांना उत्तरे मिळत आणि या सहज संवादातून नकळत त्यांच्या मनावर संस्कार होत असत.

चांदोबा, आनंद, मुलांचे मासिक, अमृत यांसारखी मासिके आणि सार्वजनिक वाचनालयेही मुलांच्या गोष्टींची भूक भागवत. या कथा केवळ करमणुकीसाठी नव्हत्या; त्यातून मुलांची कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, विचारशक्ती आणि भावविश्व समृद्ध होत असे. गोष्टी ऐकता-ऐकता मूल्ये आणि जीवनदृष्टीही त्यांच्या मनात सहज रुजत असे.

काळ बदलला... गोष्टी मागे पडल्या

बदलत्या जीवनशैलीत मुलांसाठी वेळ आहे, साधने आहेत...

पण गोष्टी सांगणारा सहवास मात्र कमी होत चालला आहे.

आजच्या गतिमान जीवनात आई-वडील आणि कुटुंबातील इतर सदस्य काम, शिक्षण आणि दैनंदिन जबाबदाऱ्यांमध्ये सतत व्यस्त असतात. मुलांसोबत निवांत गप्पा मारणे, त्यांच्या प्रश्नांना वेळ देणे आणि रोज एखादी गोष्ट सांगणे मनापासून वाटत असूनही अनेकदा शक्य होत नाही.

स्वतंत्र कुटुंबपद्धतीमुळे आजी-आजोबा आणि इतर ज्येष्ठांचा मुलांना मिळणारा सहवासही कमी झाला आहे. त्याचबरोबर अनेक पालकांना रामायण, महाभारत, पुराणे, पंचतंत्र यांसारख्या ग्रंथांतील कथा मुलांना सहजपणे सांगता येतील इतकी त्यांची ओळख असेलच असे नाही. इच्छा आहे, पण वेळ आणि योग्य माध्यमाची उणीव आहे.

“इच्छा आहे, पण वेळ आणि योग्य माध्यमाची उणीव आहे.”

आणि म्हणून... ‘भीष्म स्टोरी टेलिंग’

बदलत्या काळात गोष्टींची परंपरा थांबू नये, तर नव्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी —

या विचारातून या उपक्रमाची सुरुवात झाली.

भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीमच्या माध्यमातून भारतीय ज्ञानपरंपरेतील निवडक कथा मुलांपर्यंत सोप्या, रंजक आणि आनंददायी पद्धतीने पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे, पुराणे, हितोपदेश आणि पंचतंत्रातील कथा मुलांनी केवळ ऐकाव्यात एवढाच या उपक्रमाचा उद्देश नाही; तर त्या कथांमधून विचार, मूल्ये, जिज्ञासा आणि संस्कार त्यांच्या मनात सहजपणे रुजावेत, ही या उपक्रमामागची भावना आहे.

परंपरा तीच... माध्यम नवे.

कथेतून घडणारे बालमन

कल्पनाशक्ती आणि विचार

कथा मुलांना कल्पनेच्या नव्या विश्वात घेऊन जातात आणि स्वतंत्रपणे विचार करण्यास प्रेरित करतात.

जिज्ञासा आणि प्रश्न

कथांमधील प्रसंग मुलांच्या मनात प्रश्न निर्माण करतात आणि उत्तरांचा शोध घेण्याची वृत्ती विकसित करतात.

भावविश्व आणि संस्कार

पात्रांचे अनुभव, निर्णय आणि नातेसंबंध मुलांच्या भावविश्वाला समृद्ध करत मूल्यांची सहज रुजवण करतात.

व्यक्तिमत्त्व आणि चारित्र्य

सतत मिळणाऱ्या सकारात्मक अनुभवांतून मुलांची जीवनदृष्टी, संवेदनशीलता आणि चारित्र्य हळूहळू घडत जाते.

प्रत्येक गोष्टीतून काही शिकवायचेच आहे असे नाही; पण प्रत्येक चांगली गोष्ट मुलांच्या मनात विचार, भावना आणि जिज्ञासेचे एक छोटेसे बीज नक्कीच पेरते.

पंचमहाभूतांची ओळख... पंचकोषांचा विकास

भारतीय ज्ञानपरंपरेत मानवी जीवनाकडे केवळ बुद्धीच्या विकासाच्या दृष्टीने पाहिले जात नाही. कथा आणि त्यांतील विविध अनुभवांच्या माध्यमातून मुलांना निसर्गातील पंचमहाभूतांची ओळख होत जाते. त्याचबरोबर त्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक विकासाला पूरक अनुभवही मिळतात. अशा अनुभवांतून पंचकोषांच्या सर्वांगीण विकासाला सहाय्य होऊ शकते.

गोष्ट संपते... संस्कार राहतात.

बालपणी ऐकलेल्या अनेक गोष्टी कालांतराने विसरल्या जातात; पण त्या गोष्टींनी दिलेला विचार, निर्माण केलेली संवेदना आणि मनावर उमटवलेले संस्कार आयुष्यभर सोबत राहतात. मुलांना भारतीय ज्ञानपरंपरेतील अशाच अर्थपूर्ण कथांचा सहवास मिळावा, हीच ‘भीष्म कथा संस्कार’ या उपक्रमामागची भावना आहे.

bottom of page